|दौंड’च्या शिवराज नगरमध्ये घरफोडी| सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरीला, हवेत गोळीबार..

अख्तर काझी

दौंड : दौंड-गोपाळवाडी रोड परिसरातील शिवराज नगर येथे घरफोडीची घटना घडली असल्याची माहिती मिळत असून शिवराज नगर येथे राहणारे शिक्षक संतोष हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंद बंगल्यामध्ये 3-4 चोरट्यांनी प्रवेश करून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची माहिती या शिक्षकांनी दिली आहे.

चोरट्यांनी घराच्या दाराचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यामधील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून नेले तसेच बाथरूम मध्ये साबणाच्या रिकाम्या पुढ्या मध्ये ठेवलेले 50 हजार रुपये सुद्धा चोरट्यांनी लंपास केले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. याच परिसरातील गुरुनाथ हितनाळे यांच्या बंगल्यात सुद्धा घरफोडी करण्यात आली, त्यांचे भाडेकरू महावितरण मधील वायरमन संतोष काकडे यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी चांदीचे शिक्के व पाचशे रुपये रक्कम चोरून नेली असल्याचे समजते.

या परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला असल्याची माहिती मिळताच स्थानिक मा. नगरसेवक जीवराज पवार व युवकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. जीवराज यांनी आपल्या रायफल मधून हवेत गोळीबार केल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. एकही चोरटा हाती लागला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे कैद झाले आहेत. या परिसरामध्ये याआधी सुद्धा अनेक वेळा घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत, या परिसरामध्ये पोलीस चौकीची मागणी सुद्धा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.