दौंड नगरपालिकेचे दीपक म्हस्के ‘समाज भूषण’ गुणगौरव पुरस्काराने सन्मानित, ज्योती मोकळ यांचाही सन्मान

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के व जनकल्याण वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा ज्योती मोकळ यांना समाज भूषण गुण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र, यांच्या वतीने समाजाच्या हितासाठी व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. दौंड चे तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, लोक कल्याण आधार मंच चे पदाधिकारी प्रमोद शितोळे व तालुका अध्यक्ष नामदेव जठार- पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात गुणगौरव सोहळा पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमोद शितोळे यांनी, दीपक म्हस्के यांच्या दौंड शहरातील बचत गट ,दिव्यांग जन आणि पथविक्रेता यांच्यासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचे कौतुक केले.