अख्तर काझी
दौंड : शहरातील कुंभार गल्ली येथील दोन कुटुंबामध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणामध्ये दौंड पोलिसांनी माजी नगराध्यक्ष बादशाह शेख सह 15 ते 20 जणांवर ॲट्रॉसिटी सह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. बादशहा शेख व काही आरोपींना अटकही झाली आहे मात्र याच हाणामारी घटने मध्ये बादशाह शेख यांच्या नातलगांना मारहाण करणाऱ्या लोकांवर दौंड पोलिसांनी अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही त्यामुळे येथील महिलांनी दौंड पोलीस स्टेशन समोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने ते आरोपिंवर गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप या महिला करत असून संबंधित आरोपिंवर गुन्हा का दाखल केला जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसापूर्वी याच महिला आंदोलकांनी याच मागणीसाठी दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढीत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी पो. निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावेळी हाणामारी घटनेची माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पो. निरीक्षक पाटील यांनी आंदोलकांना सांगितले होते. परंतु आंदोलकांच्या मागणीप्रमाणे संबंधितांवर दौंड पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल न केल्याने आज दि. 6 डिसेंबर रोजी महिलांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
दि. 20 ऑक्टोबर रोजी कुंभार गल्ली येथे सदरची घटना घडली.दि. 9 नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख व इतर लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दौंड पोलिसांनी याप्रकरणी बादशाह शेख सह काही आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केलेली आहे. मात्र याच घटनेत बादशाह शेख यांच्या नातलगांनाही विरोधी गटाने मारहाण केलेली आहे, त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही असा आरोप बादशहा शेख यांच्या नातलगांनी केला आहे.
पीडित महिलेने दौंड पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, या घटनेत 15 ते 20 लोकांनी माझ्या पतीस घातक शस्त्राने मारहाण करून जखमी केले आहे, माझा विनयभंग केला आहे. या सर्वांच्या नावे मी पोलिसांकडे तक्रारही केली आहे. तक्रार देऊन कित्येक दिवस झाले तरी दौंड पोलिसांनी आज पर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. राजकीय दबावापोटी पोलीस माझ्यावर अन्याय करीत आहेत. माझ्या घरी कोणताही कर्ता पुरुष नसताना ही लोक मला त्रास देत आहेत, जीवे मारण्याची धमकी देत असतात. त्यामुळे या लोकांच्या विरोधात भा. दं. वि. 307 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा, जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा पीडित महिलेने निवेदनाद्वारे दिला आहे.