अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी परिसरातील चायनीज सेंटर जवळ एका युवका वर कोयत्याचे वार करून खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. मयूर चितारे (वय 22,रा. पासलकर वस्ती, दौंड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्जुन स्वामी काळे (रा. इंदिरानगर ,भाजी मंडई ,दौंड) असे हल्लेखोराचे नाव असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
जिथे गुन्हा कराल तिथून थेट पोलीस चौकीत हजर व्हायच…. पोलीस चौकी इतकी सेफ जागा नाही असे मुळशी पॅटर्न या चित्रपटातील डायलॉगचा अनुभव आज दौंडकरांनी अनुभवला. युवकाचा खून करून हल्लेखोर स्वतः पोलीस चौकीत हजर झाला. दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वा. दरम्यान कुरकुंभ मोरी परिसरातील चायनीज सेंटर जवळ मयत मयूर याचे हल्लेखोर अर्जुन काळे याच्याशी काहीतरी वाद झाले. वाद चालू असताना अर्जुन ने स्वतः जवळील कोयत्याने मयूरच्या डोक्यावर ,पोटावर वार करून त्याला जखमी केले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर झाली असल्याने पोलिसांना लागलीच खबर मिळाली, पो.नि. भाऊसाहेब पाटील यांनी आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.पो. क. अमीर शेख यांनी जखमी मयूर यास रिक्षा मधून येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु घाव वर्मी लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दौंड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे