दौंड
शहरात नुकत्याच झालेल्या हाणामारी प्रकरणात येथील आठ जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काहींनी शहरात हिंदू जन आक्रोश आंदोलनाची हाक दिल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, शहर शांत राहण्याच्या दृष्टीने दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी शांतता कमिटीचे आयोजन केले होते.
दौंड शहर शांत आहे, येथील सर्व सण ,उत्सव सर्वच समाज एकत्र येऊन साजरे करतात. शहरात घडलेल्या हाणामारी घटनेनंतर सर्वांनी मिळून शहर शांत कसे राहील असेच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले. यावेळी जुन्नर चे पोलीस निरीक्षक मोहिते तसेच शहरातील सर्वच पक्ष,संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वार्थी राजकारणासाठी सध्या बोगस तक्रारींमध्ये वाढ होत आहे. अशा तक्रारींची पोलिसांनी प्राथमिक चौकशी करावी, तक्रारीमध्ये सत्यता असेल तरच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग काही लोक करीत आहेत अशी शहरामध्ये चर्चा आहे ज्यामुळे येथील दलित समाज नाहक बदनाम होतो आहे याची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, शहरात झालेल्या या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे, अतिरिक्त पोलीस फौज फाट्यामुळे बाजारपेठेत ग्राहक फिरकायला तयार नाही, येथील नागरिकांना पोलीस प्रशासनाने भयमुक्त करावे, दौंड शहर अशांत करण्यासाठी नक्की कोण प्रयत्नशील आहे याचा तपास पोलिसांनी करून अशा घातक प्रवृत्तींचा त्यांनी वेळीच बिमोड करावा, चुकीच्या व जातीय तणाव बिघडविणाऱ्या अफवा पसरविल्या जात आहेत त्याचा वाईट परिणाम शहरावर होत आहे व पुढेही होणार आहे याचा सखोल तपास पोलिसांनी करून अशा लोकांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा सूचना व भावना विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
पो. नि. विनोद घुगे म्हणाले की,पोलीस स्टेशनला आलेल्या फिर्यादीची तक्रार नाकारता येत नाही, त्यामुळे तक्रार बोगस आहे का खरी हे तपासानंतरच समोर येते. कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन खंबीर आहे. शहरात घडलेल्या प्रकरणात जे योग्य आहे तेच आम्ही करणार आहोत. दौंडच्या विकासासाठी आमच्याकडून जी काही मदत लागणार आहे ती देण्याचाच आम्ही नेहमी प्रयत्न करतो. आज पर्यंत शहर शांत राहण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे अशीच शांतता ठेवावी व सर्वांनी गुण्यागोविंदाने वागावे अशी अपेक्षा करतो असेही घुगे म्हणाले. खास बंदोबस्तासाठी आलेले जुन्नरचे पोलीस निरीक्षक मोहिते यांनीही शहर शांत ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.