खडी फोडण्याचा ‘घन’ 3 तीनवेळा ‘डोक्यात’ घालून पत्नीला ‘जीवे’ मारण्याचा प्रयत्न, पाटस येथील धक्कादायक प्रकार

दौंड : पत्नीच्या डोक्यात दगड फोडण्याच्या घनाने तीनवेळा प्रहारकरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्यांच्या मुलाने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.२७/०८/२०२२ रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास पाटस, (पुनर्वसन, ता.दौंड, जि. पुणे) येथे फिर्यादी यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये त्यांचे वडील वसंत व्यंकप्पा चौगुले याने फिर्यादीची आई आणि स्वतःच्या पत्नीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात खडी फोडण्याच्या लोखंडी घनाने तीन वेळा जोरात प्रहार करून तिला गंभीररित्या जखमी केले.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादीची पीडित आई ही जागेवरच कोसळून बेशुद्ध पडल्याने फिर्यादीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अजूनही पीडित महिलेची परिस्थिती नाजूक आहे. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीचे वडील वसंत व्यंकप्पा चौगुले (रा. पाटस, पुनर्वसन, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि वाबळे करीत आहेत.