पुणे : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय घमासान सुरु आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरुद्धच बंड करत शिवसेनेचे चाळीस पेक्षा जास्त आमदार आपल्या ताब्यात ठेवले आहेत. या सर्व स्फोटक परीस्थितीमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे तळागाळातील शिवसैनिक मात्र पेटून उठत असून आता ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना दिसत आहेत.
बाळासाहेबांचा हाच तो शेवटचा व्हिडीओ ज्यात त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केले होते
आज शुक्रवारी राज्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने केली असून काही ठिकाणी बंडखोर आमदारांचे बॅनर फाडण्यात आले तर काही ठिकाणी या आमदारांच्या कार्यालयांवर दगडफेक झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. राज्यात आता शिवसैनिक बंडखोर आमदार विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा हा अखेरचा व्हिडिओ सांगितला जात असून यात ते ‘मला सांभाळून घेतले’ तसे ‘उद्धवला हि सांभाळून घ्या’आदित्यला सांभाळून घ्या… असे आवाहन आपल्या शिवसैनिकांना करताना दिसत आहेत. ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे मात्र तळागाळातील शिवसैनिक पुन्हा पेटू लागला असून राजकीय गणिते काहीही असो पण बाळासाहेब ठाकरे यांच्या परीवारासोबत जे घडतंय आणि त्यांना एकटे पाडण्याचा जो काही प्रकार सुरु आहे तो मात्र कडव्या शिवसैनिकांना रुजलेला दिसत नाही.
त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसैनिकांच्या जीवावर जे लोक आमदार झाले ते त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि फक्त बाळासाहेबांखातर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे अशी इच्छा अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
या सर्व प्रकारामुळे जरी आमदार एका बाजूला गेले तरी कडवे शिवसैनिक आणि स्वतःला बाळासाहेबांसाठी वाहून घेतलेले शिवसैनिक मात्र यातून नवीन चमत्कार घडवतील असा विश्वास जेष्ठ शिवसैनिक व्यक्त करत आहेत.