जुन्या वादातून युवकावर कोयत्याने हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न! यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे जुन्या वादातून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो युवक बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवत गावच्या हद्दीत असणाऱ्या स्टेशन रोड फाटा येथे फिर्यादी किरण मनोज गायकवाड (वय 35, रा.यवत, ता.दौंड) हा सौरभ जगदाळे, गौरव दोरगे, किरण यादव यांच्या सोबत बोलत उभा असताना अचानक तेथे विन्टो कार त्यांच्याजवळ येवुन थांबली व त्या कारमधुन आरोपी सागर माधवराव दोरगे (रा.यवत, ता.दौंड) हर्षद बाळासो जगताप ( रा.कामट वाडी, ता.दौंड) अक्षय उर्फ बंटी ईश्वर यादव (रा.यवत, ता.दौंड) व इतर दोन अनोळखी इसम असे पाचजण गाडीतुन खाली उतरून त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला, तुला लई माज आला
आहे, आज तुला खल्लासच करतो असे
म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने सागर माधवराव दोरगे याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादी किरण गायकवाड यांच्यावर सपासप दोन वार केले. यावेळी फिर्यादीने खाली वाकुन ते वार चुकवुन तेथून जिव वाचवुन पळत सुटले. यानंतरही आरोपींनी यवत स्टेशन रोड चौक व यवत येथे दहशत माजवुन भितीचे वातावरण तयार
केले.
या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने आरोपींविरुद्ध फिर्याद दिल्याने सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.