दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू करण्याच्या निर्णया विरोधात दौंडमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यात बंदी लागू केल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना चे सर्वत्र सावट असल्याने शेतकरी मागील सहा महिन्यांपासून बी, बियाणांपासून वंचित असून बियाणे, खते त्याला काळ्या बाजारातून चढ्या भावाने खरेदी करावे लागत आहे.
शेतकऱ्यांसाठी कांदा नगदी पिक म्हणून उपलब्ध असताना केंद्र सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे, अचानक पणे निर्यात बंदी केल्यामुळे भारताच्या निर्यात धोरणाला यामुळे मोठा फटका बसू शकतो याचा विचार करून सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, कोण म्हणतो देत नाय, घेतल्या शिवाय राहात नाय अशा घोषणा देत पक्षाच्या वतीने यावेळी तहसीलदारांना कांद्याची ची माळ भेट देण्यात आली.
निवेदन देतेवेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमित सोनवणे, संजीव आढाव,यादव जाधव,राजू जाधव, तसेच काँग्रेस पक्षाचे हरीश ओझा, अतुल जगदाळे, महेश जगदाळे, विठ्ठल शिपलकर व शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम आदी उपस्थित होते.