इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाने बनावट अकाउंट काढून अश्लील चॅटिंग, मलठणच्या तरुणाला अटक

दौंड : महिलेच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून तिचे फोटो विनापरवानगी पोस्ट करणे तसेच तिच्या नावाने गावातील व्यक्तींशी अश्लील स्वरूपाचे चॅटिंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी मलठण येथील स्वप्निल साहेबराव देवकाते याला अटक केली आहे. सायबर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी निष्पन्न करून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ जुलै २०२६ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवर सदर महिलेचे फोटो पोस्ट करण्यात येउन हे अकाउंट संबंधित महिलेचेच असल्याचे भासवत गावातील काही व्यक्तींशी अश्लील स्वरूपाचे चॅटिंग करण्यात आले होते. या प्रकारामुळे संबंधित महिलेची सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाली असून तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. याप्रकरणी सदर महिलेने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सायबर तांत्रिक तपास केला असता, संबंधित बनावट इंस्टाग्राम अकाउंट आरोपीच्या वापरातील मोबाईल क्रमांकावरून लॉग इन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला निष्पन्न करून रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी), ६६(डी) आणि ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत. सोशल मीडियावर कोणाच्याही नावाने बनावट खाते तयार करणे, फोटोचा गैरवापर करणे किंवा अश्लील संदेश पाठवणे हा गंभीर सायबर गुन्हा ठरू शकतो त्यामुळे अशा प्रकारांना बळी पडलेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.