लोणीकाळभोर : सहकारनामानामा ऑनलाइन (बापू धुमाळ)
आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवत नाही म्हणून तिच्या पतीने व चार मित्रांनी एका विवाहित महिलेस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथील गजबजलेल्या परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पाच जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस स्टेशनमधे दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 19 वर्षीय महिला आपल्या पतीसह उरुळी कांचन येथे भाड्याच्या घरात राहत होती. दरम्यान तिच्या पतीचे मित्र घरी येत असत. दोन दिवसापूर्वी त्याचे मित्र विशाल माने, तानाजी शिंदे, सुरज कांबळे, करण खडसे हे रात्री अकरा वाजता त्यांच्या घरी आले व त्यांनी त्या पीडितेस शरीर संबंधाची मागणी करत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यास सुरुवात केली.
मात्र पिडीत महिलेने त्यांना दाद न देता विरोध केल्याने तिच्या पतीने व चार मित्रांनी तिला लोखंडी राॅडने व पट्ट्याने मारहाण केली. यात ती जखमी झाली त्यानंतर ते चार जण निघून गेल्यावर तिच्या पतीने तिला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली यावर घरमालकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
हा अन्याय असह्य झाल्याने पिडीत महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुध्द लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी बोलताना ही घटना अतिशय धक्कादायक असून यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.