दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे असणाऱ्या ओढ्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मृत व्यक्तीच्या डोक्याला जखमा असल्याने हा खून आहे की अपघात याबाबत परिसरात चर्चा सुरू होती.
मृत व्यक्तीचे नाव उत्तम पवार असे असून तो नव्याने सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गावर पाणी मारण्याचे काम करत असल्याचे समोर येत आहे. उत्तम पवार यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर कुसेगावचे पोलीस पाटील गणेश शितोळे यांनी यवत पोलिसांना याबाबत खबर दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.
हा खून आहे की अपघात याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिसांचा तपास सुरू असून तपासाअंती खरे कारण समोर येणार आहे.