बारामती : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात आलेल्या निळकंठेश्वर पॅनलला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या दोन्ही पॅनलला मोठा धक्का बसला असून शरद पवारांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर चंद्रराव तावरे यांच्या पॅनलमधील ते स्वतःच फक्त निवडून आले आहेत.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या गटाने बळीराजा सहकार पॅनल उभे केले होते. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार हे करत होते मात्र या पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे तर अजित पवारांनी उभ्या केलेल्या निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आले असून चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी उमेदवार येथे निवडून आले आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवत होते. ते ‘ब वर्ग’ गटातून सर्वप्रथम विजयी झाले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चार पॅनल उभे होते. अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे एक असे चार पॅनल रिंगणात होते. यात अजितदादा यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे.