श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी शिक्षक, संचालकांकडून वारकऱ्यांची सेवा | आरोग्य तपासणी, औषध वितरणपासून पायांच्या मालिशपर्यंत करण्यात आली सेवा

वाखारी (दौंड) : संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारीत चालून चालून थकलेल्या आणि दमलेल्या वारकऱ्यांना औषध वितरण व मॉलिश तेलाने पायांची मालिश करून देण्याचा सेवाभावी, सामाजिक उपक्रम श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी, वाखारी (दौंड, पुणे) यांच्या वतीने राबवण्यात आला.

या सेवेमुळे पालखी सोबत वारी करणाऱ्या अनेक वारकऱ्यांचा थकवा, पायदुखी, फोड, स्नायूंचा ताण दूर होऊन या समस्यांपासून आराम मिळाला. वारकऱ्यांसाठी राबविण्यात आलेला हा संपूर्ण उपक्रम मोफत होता. या उपक्रमात बीपी, शुगर तपासणी, प्राथमिक औषधोपचार आणि मसाज सेवा देण्यात आली. हे संपूर्ण कार्य अत्यंत आपुलकी, भक्तिभाव आणि सेवा वृत्तीने पार पाडण्यात आले.

या सेवाकार्यासाठी धनशोभा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. धनाजी शेळके, सचिव सौ. राधिका शेळके, संचालक सौ. शोभा शेळके, श्री. परीक्षित शेळके, प्राचार्य डॉ. संतोष वाघमारे, विभागप्रमुख प्रा. विकास गडधे कॉलेज चे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, ‘ही सेवा करताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव पाहून आम्हालाही अंतःकरणापासून समाधान लाभले’ असे उदगार काढले.  या स्तुत्य उपक्रमाद्वारे श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसीने आरोग्य, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.