पुणे : पुणे जिल्ह्यासाठी आज १९ जून २०२५ रोजी लाल इशारा (रेडअलर्ट) दिलेला असून पुढील २४ तासांत पुणेघाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
खडवासला धरणातूनही मोठा विसर्ग होणार –
आज दि. १९ जून २०२५ रोजी खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अति पर्जन्यमानामुळे आज ठीक दुपारी १:०० वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये १९२० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी,जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्यांनी अलर्ट रहावे तसेच कुणीही नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, सखल भागातील संबंधीत नागरीकांनाही याच्या सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन उपविभागीय अभियंता, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांच्यावतीने करण्यात आले आहे.