दौंड-पुणे रेल्वेमध्ये आगीची घटना ! वाचा नेमकं काय घडलं..

अब्बास शेख

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये रेल्वे शटल मध्ये डब्याच्या आत एक आगीची घटना घडली आहे. ही घटना आज दि.१६ जून रोजी सकाळच्यावेळी धावत्या रेल्वेमध्ये घडली आहे. मिळत असलेल्या अधिक माहितीनुसार, दौंड जंक्शनवरून पुण्याला येणाऱ्या शटलमध्ये ट्रेनमध्ये आज सोमवारी सकाळी ०७:०५ च्या दरम्यान दौंडवरून निघालेल्या शटल (रेल्वे) च्या इंजिनपासून तिसऱ्या डब्यातील एका टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

घडलेल्या या घटनेमुळे शटलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मात्र याचवेळी काही प्रवाश्यांनी ज्या टॉयलेटमध्ये ही घटना घडली त्याकडे धाव घेतली. यावेळी एक प्रवासी या टॉयलेटच्या आत असल्याचे त्यांना समजले. तशातच टॉयलेट चा दरवाजा आतून लॉक झाल्यामुळे त्या व्यक्तीला बाहेर पडता येत नव्हते. याचवेळी टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागल्याने आतमधील व्यक्तीने आरडा-ओरड सुरु केली.

यावेळी जमलेल्या प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवण्यात आला. यावेळी प्रवाश्यांनी या घटनेची माहिती स्टेशन मास्तरला दिली. डब्यात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले.

सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे ही गंभीर बाब असून रेल्वे प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी यंत्रणांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.