अख्तर काझी
दौंड : शहरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच थेट पोलीस स्टेशन समोरूनच दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला दौंड पोलिसांनी जेरबंद केले. अमजद गफूर खान (वय 22,रा. नेहरू चौक, दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान दौंड पोलीस स्टेशन समोरील प्रदीप प्लाझा इमारती परिसरात लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. दुचाकी चे मालक तुषार संदीप भागवत(रा. दौंड) यांनी 4-5 दिवस दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी सापडली नाही. त्यामुळे भागवत यांनी दि. 25 फेब्रुवारी रोजी दौंड पोलिसात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली. दौंड पोलीस पथकाने शहरातील दुचाकी चोरीचा विषय गांभीर्याने घेत तपास सुरू केला.
तपासा दरम्यान महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याने, दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8वा. च्या सुमारास पोलीस पथकाने येथील नेहरू चौकात राहणाऱ्या अमजद यास ताब्यात घेतले, पोलीसी खाक्या दाखविताच त्याने पोलीस स्टेशन समोरून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. तसेच शहरातील व इतर ठिकाणाहून चोरलेल्या गाड्यांची ही कबुली दिली. अमजद कडून पोलीस पथकाने पाच दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. सध्या शहरातील प्रमुख चौकांमध्ये व विशेषतः रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढविलेली आहे, त्यामुळे आणखीनही काही दुचाकी चोरट्यांचा माग काढून त्यांनाही जेरबंद करण्याचा दौंड पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस हवालदार नितीन बोराडे ,सुभाष राऊत, किरण राऊत आणि अमीर शेख या पथकाने केली.