पुणे : पुणे जिल्ह्यात गोळीबार, हाणामारी आणि महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसामध्ये गोळीबार आणि हत्यांचे सत्र सुरु झाल्याचे दिसत आहे. हे सर्व होत असताना आता उरूळी कांचन परिसरात असणाऱ्या इनामदार वस्तीजवळ येथून एक धक्कादायक घटना उघडकीस येत असून दोन जणांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
बापू उर्फ दशरथ शितोळे या व्यक्तीने तीन ते चार जणांवर गोळीबार केल्याची माहिती समोर मिळत असून यात एकाला पाठ आणि पायावर गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारामध्ये काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर शरद गोते हे या हल्ल्यात बालंबाल बचावले आहे.
या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.