वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराजांवर गुन्हा दाखल करा

अख्तर काझी

दौंड :  प्रेषित हजरत मो. पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मुस्लिम समाजाने केली असून याबाबत उद्या दौंड पोलिस स्टेशन आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

मुस्लिम धर्माबद्दल तसेच प्रेषित मो. पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून देशाची कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या, श्रीरामपूर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या मागणी करिता दौंड शहर व तालुका समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दौंड पोलीस प्रशासन, तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्याय ,अत्याचार व हल्ल्यांचाही यावेळी निषेध करण्यात येणार आहे.

रामगिरी महाराज यांच्या, देशातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या या कृत्याचा दौंड मधील काही धर्मांध लोक समर्थन करीत असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट वरून दिसत असल्याचा आरोप मुस्लिम बांधवांकडून होत आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा धर्मांध लोकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवून, त्यांच्याकडून जर असे कृत्य होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात येणार असल्याचे समस्त मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येत आहे.