चोरी, घरफोड्या करणारा आरोपी दौंड पोलिसांनी केला जेरबंद, चोरीत तीन अल्पवयीन साथीदारांचा समावेशाने खळबळ

अख्तर काझी

दौंड : घराच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. सदरची चोरी करताना त्याला मदत करणाऱ्या शहरातील तीन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहुल नागेश गायकवाड(रा. सम्राट नगर, दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेली तीन अल्पवयीन मुले शहरातील भिम नगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांना याबाबत समज देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, येथील स्टेट बँक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरातील बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी अज्ञात चोरट्याने केली होती. या संदर्भात दि. 8 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल होता. या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तापासाबाबत सूचना केल्या होत्या. तपासा दरम्यान खबरी मार्फत या घटनेतील आरोपींची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने राहुल गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपल्या साथीदारांसमवेत चोरी केल्याचे कबूल केले.

आरोपींकडून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.
सदरच्या चोरीच्या घटनेत अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर आल्याने पो. नि. चंद्रशेखर यादव यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची सध्या आवश्यकता आहे. आपली मुले व्यवस्थित शाळेत जातात का, त्यांची संगत कुणाबरोबर आहे, दिवसा किंवा रात्री ते कोणाबरोबर असतात, आणि ते काय करतात याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .