भोर : भोर येथील सम्राट चौकात एकाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या ३ आरोपींना LCB च्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे.
या गुन्ह्याबाबत भोर पोलीस स्टेशनला फिर्यादी वर्षा गणेश सांगळे (रा.नागोबाअळी भोर ता. भोर जि पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा आनंद सांगळे व त्याचा मित्र आकाश मोरे हे
दि.०३/१०/२०२१ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास मोटारसायकलवरून सम्राट चौक, कच्छी दाबेली येथे गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा आनंद सांगळे व सनी बारंगळे, अमीर मनेर, समीर मनेर यांच्यात पूर्ववैमनस्यातून वादावादी झाली. या वादावादीतून सनी, अमिर व समीर याने आनंद सांगळे याच्या डोक्यात दगडाने वार करून खून केला होता.
सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सुचना पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक यांनी LCB ला दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना त्यांना गोपनीय खबर मिळाली की सदर गुन्ह्यातील तिन्ही प्रमुख फरार आरोपी हे कापूरहोळ पुलाखाली थांबलेले असून ते बंगळुरू येथे जाण्याच्या तयारीत आहेत. हि खात्रीशीर माहिती पोना अमोल शेडगे यांना मिळाल्याने पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता खुनातील प्रमुख तिन्ही आरोपी पुणे-बंगळुरू रोडवर कापूरहोळ पुलाखाली उभे असल्याचे त्यांना दिसले. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेत सदर गुन्ह्याची अधिक चौकशी केली असता आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी भोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, LCB चे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. रामेश्वर धोंडगे, पोसई अमोल गोरे, पोना. अमोल शेडगे, पोना. बाळासाहेब खडके, पोकॉ. मंगेश भगत, मपोकॉ. पुनम गुंड यांनी केली आहे.