दौंड : दौंड शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 24 किलो 85 ग्रॅम गांजा पकडला असून त्याची बाजारात 3 लाख 72 हजार 750 रुपये इतकी किंमत आहे. सपन बेनीत बीर असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी या पथकाला दौंड रेल्वे स्टेशन बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील, दौंड पोलीस स्टेशन यांनी मा.उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस स्टेशनचे पथक तयार करून दौंड रेल्वे स्टेशन येथे जावून छापा टाकला. त्यावेळी आरोपी सपन बेनीत बीर (रा. अटली ता. नवगाडा जि. गजपती, ओरिसा) हा मिळून आला. त्याच्याकडे असणाऱ्या बॅगची पंचांसमक्ष झडती घेतली असता बॅगमध्ये
प्लास्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेल्या गठ्ठ्यांमध्ये एकूण 24 किलो 85 ग्रॅम गांजा सापडला ज्याची बाजारात अंदाजे किंमत
3,72,750 इतकी आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल दत्तात्रय गावडे (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद देउन गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग स्वप्निल जाधव, यांच्या
मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सपोनी राहुल गावडे, सहा फौज. हनुमंत पासलकर, पो.हवा. सचिन घाडगे, आसिफ शेख, विजय कांचन, अजित भुजबळ, हेमंत विरोळे, रामदास बाबर,
अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, चा सहा. फौज मुकुंद कदम यांनी केली आहे.