पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प ! 235 किमीचा रेल्वेमार्ग उभारला जाणार, अवघ्या 1:45 मिनिटांत पुण्यावरून नाशिकला पोहोचता येणार



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्या वतीनं ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण झाले. या अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादनं व मालवाहतुकीला गती मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित मान्यवरांना दिली.

पुणे, नाशिक ही शहरं औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे,अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यात स्थानिकांना प्रथम प्राधान्य असेल. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापलं जाणार आहे. सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिलं जाईल. प्रकल्पाचा शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्यात येईल. यासाठी चिनी उत्पादनं किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत. ‘कोरोना’चं संकट असलं तरी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सहकार्यानं प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.