दौंड : सहकारनामा ऑनलाइन(अब्बास शेख)
– हातावर क्वारंटाईन म्हणून मारलेला शिक्का म्हणजे ती व्यक्ती कोरोना रुग्ण आहे असा समज करून घेणे चुकीचे असून बाहेरील देशातून पर्यटन करून आलेल्या व्यक्तींना काही दिवस घरात एकांतवासात राहण्याचा सल्ला दिला जातो, खबरदारी म्हणून त्यांनी काही दिवस सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळू नये म्हणून चौदा दिवस त्यांना घरातच राहण्यास सांगितले जाते त्यास होम क्वारंटाईन असे संबोधले जात असून क्वारंटाईन म्हणजे कोरोना रुग्ण असा समज चुकीचा असल्याची माहिती दौंडचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली आहे. होम क्वारंटाईन ठेवलेल्यांमध्ये खामगाव 5, केडगाव 6, वरवंड 1, दौंड शहर 2, आणि देऊळगाव राजे 1. अश्या लोकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही अफवेला, सोशल मीडियावरील पोस्टला बळी न पडता घाबरू नये तर खबरदारीचे उपाय म्हणून तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर, हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे याचे पथ्य पाळावे असे आवाहनही दौंडचे आमदार राहुल कुल, गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका आरोग्यधिकारी रासगे यांनी केले आहे.