BREAKING NEWS | यवत मध्ये भयानक हत्याकांड, एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात ‘एकजण ठार’ तर ‘तीन गंभीर’

दौंड (अब्बास शेख) :  दौंड तालुक्यातील यवत येथे असणाऱ्या मुळीक वस्तीवर काल रात्री एका कुटुंबावर भयंकर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातील घटनेमध्ये एकजण जागीच ठार झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती सुद्धा अतिशय नाजूक असून यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यातील आरोपिंचा शोध सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल दि. 5 मार्च रोजी रात्री साधारण 10:30 च्या दरम्यान निळकंठेश्वर मंदिर परिसरातील मुळीक वस्ती येथे राहणाऱ्या शशिकांत पांडुरंग चव्हाण यांच्या घरावर अज्ञात तीन जणांनी अचानकपणे हल्ला चढवला. या हल्ल्यात शशिकांत चव्हाण यांचा मुलगा विश्वजित चव्हाण हा जागीच ठार झाला तर शशिकांत चव्हाण यांची पत्नी उज्वला, मुलगी प्राची यादव हे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. याबाबत मृत विश्वजित चव्हाण याची पत्नी सारिका चव्हाण हिने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हल्ला होताच विश्वजित ची पत्नी सारिका ने प्रसांगवधान दाखवत आपल्या दोन चिमुकल्यांचा जीव वाचवला.. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, 5 मार्च रोजी रात्री साधारण 10:30 च्या दरम्यान चव्हाण कुटुंब झोपी जाण्याच्या तयारीत असताना घराच्या आजूबाजूला कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर भुंकण्यास सुरुवात केली त्यामुळे विश्वजित चव्हाण याने दरवाजा उघडून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी लाकडी दांडके व दगडाच्या सहाय्याने हल्ला चढवला यावेळी विश्वजित ने दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला असता या हल्लेखोरांनी लाथ मारून दरवाजा उघडून त्याच्यावर जबर हल्ला चढवला त्यामुळे विश्वजित गंभीर जखमी होऊन गतप्राण झाला. हा प्रकार सुरु असताना त्याची पत्नी सारिका हिने आपली दोन्ही चिमुकली मुले बाथरूममध्ये लपवून स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले व मुळीक वस्तीवरील संतोष मुळीक आणि अरुण मुळीक यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. यावेळी हल्लेखोर हे सारिका यांचे सासरे शशिकांत चव्हाण, सासू  उज्वला व नणंद प्राची यादव यांच्या डोक्यामध्ये बेरहमपणे लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याच्या प्रयत्न करत होते.

दोघेजन ऐनवेळी आले अण हल्लेखोरांचा डाव फसला.. मृत विश्वजित चव्हाण याची पत्नी व फिर्यादी सारिका चव्हाण यांनी फोन केल्यावर संतोष मुळीक आणि अरुण मुळीक हे दुचाकीवरून घरासमोर आले त्यावेळी हल्लेखोर हे चव्हाण कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यामध्ये दांडक्याने जोर जोरात मारून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ऐनवेळी वरील दोघेजन आल्याने हल्लेखोर हे घराच्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडून पसार झाले. हल्लेखोरांनी घरातील सर्वांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरी हल्ला चढवला होता मात्र मृत विश्वजित च्या पत्नीने धैर्य दाखवत शेजाऱ्यांना फोन केल्याने तिचा अण तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा जीव वाचला आहे मात्र यातील दोघेजण अजूनही गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे आपल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी पोहचून त्यांनी जखमींना त्वरित रुग्णालयात हलवले आणि घटनेबाबत वरिष्ठांना घटनेची माहिती देत आरोपिंचा शोध सुरु केला आहे.

विशेष सुचना – या बातमीतील मजकूर  भुरट्या, बोगस स्वयंघोषित लिखाण बहाद्दरांनी कॉपी करून स्वतःच्या बातमीत वापरण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल