प्रक्षोभक भाषणांनी यवत हादरले, घटना निषेधार्हच मात्र नंतर जे घडलं ते योग्य होतं का..?

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे एक अतिशय निषेधार्ह घटना घडली. बाहेरून यवत येथे स्थायिक झालेल्या एका संशयीत व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची मनाला वेदना देणारी अशी ही घटना होती. या घटनेचा सर्वच स्तरांमधून निषेध करण्यात येत होता. खास करून हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी २७ तारखेला सकाळी निषेध सभा घेऊन यातील व्यक्तीला पोलिसांनी त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती.

यावेळी मुस्लिम समाजाच्या तरुणांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या सारखे पराक्रमी योद्धे आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला लाभले हे आपल्या सर्वांचे नशीब आहे आणि गर्वाची गोष्ट आहे मात्र अश्या या पराक्रमी महाराजांच्या पुतळ्याची ज्या नराधमाने विटंबना केली आहे त्याला कठोरात कठोर शासन व्हावे अशी जोरदार मागणी केली आणि या घटनेचे जितके दुःख तुम्हाला आहे तितके आम्हालाही आहे आणि आम्ही सुद्धा या घटनेच्या निषेधार्थ आमची दुकाने बंद ठेवत असल्याची त्यांनी यावेळी जाहिर केले होते. हे सर्व होत असताना काहींनी मात्र वेगळेच नियोजन केले होते की काय अशी शंका सायंकाळची निषेध सभा झाल्यानंतर उपस्थित होऊ लागली.

कारण या सभेत एका विशिष्ट समाजाला पूर्णपणे टार्गेट करण्यात येउन अतिशय खालच्या भाषेचा वापर करण्यात आला. मरा किंवा मारा या भाषेचा वापर करून एक प्रकारची दहशत बसविण्याचा प्रयत्न केला गेला. त्या विशिष्ट समाजातील कोणी जरी सभेत दिसला तरी त्याला सोडायचे नाही असा मेसेज तर दुपार पासूनच सोशल मीडियावर फिरत होता. ज्यावेळी ही सभा सुरु झाली आणि या सभेत ज्याने ज्याने सामाजिक सलोखा यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला त्याला त्याचे भाषण बंद करण्यास भाग पाडण्यात आले.

एका विशिष्ट समाजाला मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येउन शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. अतिशय खालच्या भाषा शैलीचा वापर करण्यात येउन दोन समाजात तेढ निर्माण होऊन वातावरण कसे दूषित होईल याचाही प्रयत्न केला गेला. त्यामुळे सकाळची झालेली निषेध सभा आणि सायंकाळी गावातील कमी आणि बाहेरून आलेल्यांची झालेली सभा यात जमीन आसमानचा फरक पहायला मिळत होता. या सभेमध्ये जे यवत येथील पिढ्यानपिढ्या स्थानिक आहेत त्यांची नावे घेऊन मोठ्या प्रमाणावर शिव्यांची लाखोली वाहिली गेली आणि दोन समाजात वाद कसा उद्भवेल याचा आटोकाट प्रयत्न केला गेला असे प्रत्यक्षदर्शी सांगतात आणि भाषणांच्या क्लिप ग्वाही देत आहेत. मात्र मानावे लागेल ते यवतच्या नागरिकांना ज्यांनी शेवटपर्यंत आपला तोल जाऊ दिला नाही आणि अतिशय प्रक्षोभक भाषणे होत असतानाही त्यांनी कोणतेच असे चुकीचे कृत्य केले नाही ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना अत्यंत निषधार्ह आणि मनाला चीड आणणारी होती मात्र या घटनेच्या आडून ज्यांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही, ज्यांनी आरोपीवर कारवाई करा आणि त्याला कडक शासन करा अशी मागणी केली त्यांनाच टार्गेट करून जी भाषणे झाली ती मात्र माणुसकीला आणि सामाजिक सलोख्याला न शोभणारी अशी होती. त्यामुळे ज्याच्या हातून हे कृत्य झाले त्याला कायद्याने कडक शासन व्हायलाच हवे मात्र यात ज्या समाजाचा आणि त्या समाजातील इतर लोकांचा दुरानवेही काही संबंध नाही अश्यांना टार्गेट करणे, लोकांना लोकांच्या विरोधात चिथावणे, भर चौकात आया बहिणींसमोर अतिशय खालच्या पातळीवर शिव्या घालणे हे कितपत योग्य आहे असाही प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.