रखडलेल्या कोल्हापूर-सांगली भूसंपादनासह चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा

सुधीर गोखले

सांगली : बरीच वर्षे रखडलेला रत्नागिरी नागपूर महामार्गातील महत्वाचा टप्पा कोल्हापूर सांगली हा महत्वाचा रस्त्याचे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीनुसार केंद्रीय दळणवळण आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता मंजुर केला असून आता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ने हा रस्ता ओळखला जातो.

कोल्हापूर-शिरोली-सांगली असा हा रास्ता भूसंपादनाच्या फेऱ्यात बरीच वर्षे रखडला होता. त्याला आता केंद्र पातळीवर ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे या रस्त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादन आणि चौपदरीकरण कामास गती मिळणार आहे. विशेष म्हणजे हा प्रस्तावित रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या रस्त्याचा डी पी आर बनवण्यात आला त्यानुसार प्रस्तावित रस्त्यासाठी काही भूसंपादन आवश्यक होते मात्र या भूसंपादनासही लागणारी अंतिम मंजुरी प्रलंबित होती या मुळे या रस्त्याचे काम पुढे सरकत नव्हते.

ही बाब लक्षात येताच खा. धैर्यशील माने यांनी विशेष अधिवेशन दरम्यान दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याविषयी लेखी मागणी केली होती. या मागणीनुसार मंत्री गडकरी यांनी तातडीने या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देत या रस्त्यासाठी लागणारे आवश्यक भूसंपादन करून रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.