केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे जमिनीच्या वाटणीच्या वादातून भाऊ आणि मुलांनी भाच्यांना आणि बहिणीला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धैर्यशील राजेंद्र चौधरी (रा. बोरिपार्धी, धायगुडेवाडी ता.दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि धैर्यशील चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, दि. 15/08/2025 रोजी ते दुपारी 1.00 च्या सुमारास बोरीपार्धी (ता.दौंड.जि.पुणे) या गावच्या हद्दीत असणाऱ्या त्यांच्या धायगुडेवाडी येथील घराकडे जात असताना तेथील कच्च्या रस्त्यावर त्यांच्या आई आणि भावाला आईचे भाऊ आणि त्याची मुले मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले त्यामुळे ते भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही नागनाथ एकनाथ शेलार, मंगेश नागनाथ शेलार, मयुर नागनाथ शेलार, संगीता नागनाथ शेलार, पुनम नागनाथ शेलार, ईश्वर चव्हाण (भाडेकरू) यांनी बेकायदा गर्दी, जमाव जमवून मारहाण केली.
फिर्यादीची आई आणि त्यांचे मामा यांच्यात कोर्टामध्ये जमिनीच्या वाटपावरून वाद सुरु आहे. याचा राग मनात धरुन फिर्यादी यांच्या आईला आरोपिंनी ‘तुम्ही येथे रहायचे नाही, ही जागा आमची आहे’ असे म्हणत मारहाण सुरु केली. हे पाहून फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपिंनी त्यांच्यासह त्यांची आई संगिता चौधरी व त्यांचा भाऊ धनंजय चौधरी यांना लाकडी काठी आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाण करताना फिर्यादीची आई संगिता चौधरी हिच्या तोंडावर आरोपी मंगेश नगनाथ शेलार याने हाताने जोरात बुक्की मारून एक दात पाडून सर्वांना जिवे मारण्याची धमकी देऊन सर्व आरोपी निघून गेले असे फिर्यादित म्हटले आहे.
फिर्यादी धैर्यशील चौधरी यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी दि. 18 ऑगस्ट रोजी आरोपी 1) नागनाथ एकनाथ शेलार, 2) मंगेश नागनाथ शेलार, 3) मयुर नागनाथ शेलार, 4) संगीता नागनाथ शेलार, 5) पुनम नागनाथ शेलार, 6) ईश्वर चव्हाण (सर्व रा.बोरीपार्धी, धायगुडेवाडी ता.दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नूतन चव्हाण या करीत आहेत.