अख्तर काझी
दौंड : स्वातंत्र्य सैनिक, दौंड चे मा. आमदार कै. जगन्नाथ पाटसकर यांच्या कुटुंबीयांना आपल्या हक्काच्या घरासाठी शासनाने तब्बल 31 वर्षापासून वंचित ठेवले आहे. कै. जगन्नाथ पाटसकर यांनी दौंड शहराच्या विकासाच्या दृष्टीने सन 1992 साली स्वतःच्या मालकीची साडेसात एकर जागा येथील उपजिल्हा रुग्णालय व एसटी स्थानक (डेपो) च्या उभारणीसाठी राज्य शासनाला दिली.
त्या बदल्यात शासन पाटसकर यांना घर बांधून देणार असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु आजतागायत कै. पाटसकर यांच्या कुटुंबीयांना शासनाने घर दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला कोणी घर देता का घर असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. आणि यामुळेच पाटसकर कुटुंबीयांची तिसरी पिढी दुसऱ्यांच्या जागेत भाड्याने राहत आहे.
पाटसकर कुटुंबीयांवर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज दि. 23 ऑगस्ट रोजी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शासनाच्या पोकळ आश्वासनाविरोधात पोकळ बांबू मोर्चा आंदोलन करण्यात आले. कै. पाटसकर यांच्या घरापासून मोर्चास सुरुवात करण्यात आली व नवीन तहसील कार्यालय आवारामध्ये मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेलार यांनी स्वीकारले.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप तसेच आप्पासो पवार, नंदू जगताप, विक्रम पवार, दादासो. नांदखेले, शैलेंद्र पवार, शिवसेनेचे अनिल सोनवणे, आनंद पळसे ,संतोष जगताप ,मनसेचे सचिन कुलथे व मराठा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.