अब्बास शेख
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात सभा झाली या सभेत मोदींनी विरोधकांवर प्रखर टिका केली. त्यांनी पवारांचे नाव न घेता महाराष्ट्रातील एक ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला मात्र आता याच टिकेवरून पवार समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या टिकेमुळे राज्यात पुन्हा 2019 सारखं वातावरण फिरतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी बारामती आणि पुणे या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात प्रचार सभा पार पडली. या सभेत मोदींनी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर भटकती आत्मा अशी अत्यंत बोचरी टीका केली. भाषणात मोदी म्हणाले, की आमच्या येथे असं म्हटलं जातं की काही ‘भटकती आत्मा’ असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहतात ते आत्मे भटकत राहतात. स्वत:चं काही झालं नाही तर दुसऱ्यांच्या गोष्टी बिघडविण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्र देखील अश्या भटकत्या आत्म्याचा शिकार झाला आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका बड्या नेत्याने स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र हा अस्थिरतेमध्ये गेला आहे.
यामुळेच अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाहीत. 2019 मध्ये या भटकती आत्माने जनादेशाचा अपमान केला आणि राज्याला अस्थिर केले, आता ते देशालाही अस्थिर करू पाहत आहेत. मोदींनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, देशाला या भटकती आत्मापासून वाचवून देशात एक स्थिर, मजबूत सरकार देऊन पुढे जाणं गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मोदींचा रोख हा शरद पवारांवर होता आणि त्यांनी भटकती आत्मा शरद पवार यांना म्हटले आणि ते नागरिकांना कळून चुकले हे त्यांच्या चर्चेतून पुढे येत आहे. शरद पवारांबाबत करण्यात आलेल्या या विधानामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी आता या विधानाचा फायदा शरद पवारांच्या मागे सहानुभूती लाट तयार होऊन त्यांची ताकद वाढणार असे म्हटले आहेत. तर काहीजण मात्र हे विधान महायुतीसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे म्हणत आहेत.
मोदीं च्या विधानाचा फायदा की तोटा..
सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात जनता कुणाला कौल देणार याबाबत अजूनही पक्के असे वातावरण बनलेले दिसत नाही. त्यामुळे पक्का अंदाज हा कुणालाच लावता येत नाही. उद्धव ठाकरे यांचं पाडण्यात आलेलं सरकार आणि शिवसेना, राष्ट्रवादी मधील झालेली फाटाफूट ही मतदारांमध्ये आजही चर्चेचा विषय आहे. ज्या पद्धतीने पक्ष फुटले त्याचा महाराष्ट्रातील मतदारांवर वेगळाच परिणाम पहायला मिळत आहे. त्यातच शरद पवार हे वयाच्या 84 व्या वर्षी नवा पक्ष आणि चिन्ह घेऊन लोकांसमोर गेल्याने त्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूती तयार झाल्याचे विविध सर्व्हेमधून दिसून आले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो ‘भटकती आत्मा’ हा उल्लेख केला त्याचा नेमका परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2019 साली शरद पवारांवरील टिकेने वातावरण फिरले होते..
साधारण पाच वर्षापूर्वी म्हणजे 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा (इरा) काळ संपला आहे असे विधान केले होते. पण त्यांच्या या विधानामुळे राज्यात शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती तयार होऊन यात राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला होता. शरद पवारांनी देखील याचा फायदा उचलत जोमाने कामाला सुरुवात केली आणि सातारा येथील पावसाच्या सभेने तर कहर करत लोकनेते उदयनराजे भोसले यांचा लोकसभा पोट निवडणुकीत पराभव केलाच पण राज्यातही अधिक जागा मिळविण्यात यश आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भटकी आत्मा या विधानाचा काय परिणाम होतो आणि महायुतीला याचा फायदा होतो की तोटा हे लवकरच समजणार आहे.