मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये याचे पडसाद उमटले. यामध्ये आता खासदार संजय राऊत यांनीही राज्यसरकारवर गंभीर आरोप केले असून मराठा आंदोलन चिरडण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून कुणी दिले असा आरोप करत सध्याच्या सरकारमध्ये तीन-तीन जनरल डायर आहेत असा हल्ला त्यांनी चढवला आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये कमालीचा रोष उत्पन्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये गावे बंद ठेऊन या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी राज्यसरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी बोलताना, पोलिसांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना वरिष्ठ पातळीवरून कुणी आदेश दिले आणि शांततेच्या माध्यमातून सुरु असलेले मराठा आंदोलन कुणी चिरडण्याचा प्रयत्न केला हे महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधात असताना त्यांच्यावर ईडी च्या माध्यमातून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले मात्र ते सत्तेत सामील होताच त्यांचे नाव वगळण्यात आले असून झरांडेश्वर कारखान्याला क्लीन चिट दिली गेली असे त्यांनी म्हटले आहे.