तुमचे ‛वाहन’ चोरीला गेल्यानंतर नेमके त्याचे होते ‛काय’..? चोरट्यांनीच केला ‛खुलासा’

अब्बास शेख

तुमचे वाहन चोरीला जाते, तुम्ही दोन-चार दिवस त्याचा शोध घेता आणि नंतर तुम्ही वाहन चोरीला गेल्याची फिर्याद देता. मात्र अनेकवेळा चोरीला गेलेले वाहन तुम्हाला कधी सापडतच नाही. मग ते वाहन कुठे जाते ? त्याचे काय होते ? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडत असेल तर याचे उत्तर वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांनीच दिले आहे. अहमदनगर पोलिसांनी या चोरट्यांना अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

दि.१९/०२/२०२३ रोजी मनिष मदनलाल फुलढाळे (वय ५२ वर्षे रा महाविर अपार्टमेंट, ख्रिस्तगल्ली अहमदनगर) यांची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच २० बी ए ४३०४) ही गाडी त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं १७२/ २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल ही अहमद मुन्ना शेख (रा. मुकुंदनगर अहमदनगर) याने चोरी केली असुन ती त्याने त्याचा साथीदार शाहरुख आलम शेख (रा.नागरदेवळे ता. नगर जि अहमदनगर) याच्या घरात लपवुन ठेवली होती व त्यानंतर कोठेतरी ती घेवुन जावुन तीचे सर्व वेगवेगळे स्पेअरपार्ट सुटटे करुन भंगारच्या दुकानामध्ये विक्री करुन त्याची विल्हेवाट लावलेली असल्याचे समजले.

वरील माहिती मिळाल्याने कोतवाली पोलिसांनी आरोपी १.अहमद मुन्ना शेख २. शाहरुख आलम शेख यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरची बुलेट मोटारसायकल ही आम्ही चोरुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार विक्रेते दुकानदार आरोपी नामे ३. जावेद रऊफ शेख (रा.सादिकमळा भिंगार अहमदनगर) ४. राम विलास ससाणे (रा.गजराजनगर अहमदनगर) यांना विक्री केल्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपी हे अगोदर गाड्या चोरतात आणि त्यानंतर ते त्या गाड्या खोलून त्यांचे स्पेअर पार्ट्स भंगार दुकान चालकांना विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. चोरट्यांच्या या फंडयामुळे वाहन धारकाला त्याचे चोरीला गेलेले वाहन पुन्हा कधीच मिळत नाही.

अहमदनगर पोलिसांनी या चोरट्यांना अटक करुन चोरीस गेलेल्या बुलेटचे वेगवेगळे सुटटे स्पेअरपार्टस, इंजिन, चेसीज हे रिकव्हर केले आहेत. मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींना दोन दिवस तर मोटरसायकल खोलून विल्हेवाट लावणाऱ्या भंगार दुकानदारांना एक दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोनि चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपींकडे अधिक विचारपूस सुरू असून त्यांच्याकडून असे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.