अब्बास शेख
दौंड तालुक्यातील वाखारी-चौफुला येथे शासकीय मान्यता असलेल्या अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची माहिती हवेसारखी पसरली आणि संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली. जो तो फोन करून पत्रकार आणि पोलिसांना याची माहिती विचारू लागला. कुणी म्हणत होते की चौफुला येथे गोळीबार झाला तर कुणी म्हणायचे वाखारी येथील कलाकेंद्रात गोळीबार झाला.
याबाबत अनेक वृत्तवाहिन्या आणि पोर्टल आपापल्या अँगलने बातमी देऊ लागले. मात्र या घटनेची तक्रार यवत पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे हे ज्यावेळी सर्वांना समजले त्यावेळी मात्र सर्वांच्या नजरा पोलिसांच्या जबाबाकडे खिळल्या. यात सर्वात महत्वाचा भाग होता फिर्याद आणि फिर्यादी.. त्यामुळे घटना काय, नेमका फिर्यादी कोण आणि त्याने काय फिर्याद दिली याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. अखेर फिर्यादीचा जबाब ‘सहकारनामा’ च्या हाती लागला आणि सर्वात प्रथम तो जबाब आपल्या वाचकांना वाचण्यासाठी समोर आणण्यात सहकारनामा ला यश आले असून फिर्यादीने जी माहिती दिली ती वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय मात्र राहणार नाहीत.
फिर्यादीने सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम… या घटनेतील फिर्यादी बाबासाहेब राजश्री अंधारे (वय ३८ वर्षे. व्यवसाय मॅनेजर,अंबिका कला केंद्र, रा. आनदग्राम वाखारी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२१ जुलै २०२५ रोजी रात्री बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम हे वाखारी येथील अंबिका कला केंद्रात आले. यावेळी त्यांनी दोन पार्टी बुक केल्या व नंतर रात्री १०:३० वाजता तिसरी पार्टी घेतली, ज्यामध्ये ५ महिला त्यांनी नृत्यासाठी घेतल्या होत्या असा घटनाक्रम सांगितला.
या लोकांची ही पार्टी म्हणजेच बारी १०:३० ते ११:३० वाजेपर्यंत सुरु होती. लावण्यवतींच्या लावणीपुढे हे सर्व गडी पुरते घायाळ झाले होते. आता वेळ होती काहीतरी वेगळं करून आपली स्वतःची मर्दानगी चव्हाट्यावर आणण्याची. कारण ‘हम भी कुछ है’ ही खाज भल्या भल्यांना स्वस्त बसू देत नाही, आणि हे तर शेवटी राजकारणाशी निगडित मंडळी होती (असा दावा आम्ही नव्हे तर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये केला आहे) मग काय या पार्टीदरम्यान बाळासाहेब मांडेकर हा उठला आणि त्याने नाचता नाचता आपल्याजवळील पिस्तूल काढून थेट हवेत गोळीबार केला.
या घटनेने तेथील उपस्थित सर्वचजण हादरून गेले कारण ही गोळी पिस्तूलातून सुटून थेट भिंतीला व नंतर छताला लागल्याचे सर्वांनी पाहिले. त्याचा थोडा जरी हात इकडे तिकडे झाला असता तर एखादी लावण्यवती थेट इंद्र दरबारी स्वर्गात नृत्य करण्यासाठी गेली असती याची त्यावेळी कल्पना आल्याने लावण्यवतींच्या चेहऱ्यावरील मेकअप घामाने पुरता निघून गेला होता. या नंतर मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून चारही आरोपी घटनास्थळावरून निघून गेले. फिर्यादीने घटनास्थळी भिंतीवर व छतावर पाहिले असता त्या ठिकाणी गोळी लागल्याच्या खुना दिसुन आल्या तर खाली फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा फिर्यादिला मिळून आला.
आता तो गोळीचा तुकडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही आणि कोणी जखमी सुद्धा झाले नाही. या घटनेनंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये येवून बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार दिल्यानंतर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.