विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांच्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी दौंड आर.पी.आय रस्त्यावर उतरणार

अख्तर काझी

दौंड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये एका डॉक्टर महिलेला न्याय मिळविण्यासाठी झगडावे लागत असेल तर ही सर्वांसाठी नक्कीच शोकांतिकेची बाब आहे. समाजाकडून व पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर डॉ.भावना धुमाळ (गायकवाड) यांना अमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे हे त्याहूनही लज्जास्पद आहे असे बोलले जाऊ लागले आहे. आणि म्हणूनच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी मित्र दादासाहेब गायकवाड यांच्या नातीसाठी( डॉ.भावना गायकवाड) आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे.

डॉ.भावना यांना वारंवार जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या डॉक्टर सदानंद धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांना जर पोलिसांनी त्वरित अटक केली नाही तर पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन पक्षाच्यावतीने दौंड चे विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांना देण्यात आले आहे.

डॉ. सदानंद धुमाळ व त्यांचे कुटुंबीय डॉ. भावना यांना सन 2016 पासून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. त्यांना होणारा हा त्रास, डॉ. सदानंद धुमाळ हे त्यांच्या प्रेयसीला घरात आणण्यासाठी देत आहेत, त्यांच्या लव स्टोरी मध्ये डॉ. भावना या अडसर ठरत आहेत म्हणूनच त्यांना संपविण्याचा कट डॉ.धुमाळ व त्यांच्या प्रेयसीने रचला आहे.

पतीच्या प्रेयसीने त्यांना मारण्यासाठी भाडोत्री गुंडाला सुपारी दिली होती असे धक्कादायक विधान डॉक्टर भावना यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा व यातील दोषींना कडक शासन करावे अशी मागणी ही पक्षाकडून केली जात आहे. निवेदन देतेवेळी आरपीआय पक्षाचे पदाधिकारी रवींद्र कांबळे, विकास कदम, प्रकाश भालेराव, सतीश थोरात, भारत सरोदे, नागेश साळवे, नरेश डाळिंबे, आरिफ शेख, नितीन गाडे, शंकर जगताप आदी यावेळी उपस्थित होते.