दौंड (अख्तर काझी) : विशाल गडापासून दूर असलेल्या गजापूर गावामध्ये काही धर्मांध समाज कंटकांनी दंगल घडवून आणली, येथील मुस्लिम समाजाला लक्ष करून त्यांच्या घरांचे, मालमत्तांचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले तसेच या समाजकंटकांनी विशेष करून धार्मिक स्थळालाही लक्ष करीत तोडफोड केली. सदर घटनेमुळे शाहू- फुले -आंबेडकरांच्या या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. या संतापजनक घटनेचा दौंड मधील मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध नोंदविला.
शुक्रवार (दि. 19) रोजी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाला निषेधाचे व मागणीचे निवेदन दिले. यावेळी येथील शाही आलमगीर मशिदीचे मुख्य विश्वस्त युसुफ इनामदार, मा. नगराध्यक्ष बादशहा शेख, सोहेल खान, इसामुद्दीन मण्यार, मतीन शेख, मा. नगरसेवक वसीम शेख तसेच दलित संघटनांचे पदाधिकारी नागसेन धेंडे, भारत सरोदे, रतन जाधव, टी.काझी, फिरोज खान व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी निवेदन स्वीकारले.
विशाल गडावरील अतिक्रमण काढण्याच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांनी षडयंत्र रचित गजापूर गावात जातीय तेढ निर्माण करणारी दंगल घडवून आणली. येथील मुस्लिम समाजावर हल्ला करण्यात आला, या घटनेमागील षडयंत्र रचणाऱ्या खऱ्या सूत्रधाराला व दंगल घडविणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी यावेळी केली. दंगल गजापूर येथे झाली असताना, दौंड मधील काही समाजकंटक त्या दंगलीचे स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवून येथील मुस्लिम बांधवांची माथी भडकाविण्याचे काम करीत आहेत. ज्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे. दौंड पोलिसांनी अशा समाजकंटकांना शोधून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
सध्या दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय -अत्याचार केले जात असल्याचे चित्र आहे आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा घातक ठरणार आहे. याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे . त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच अशा अप्रिय घटना रोखून, घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ,घटनेत सामील असलेल्या गुंडांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी आपल्या भाषणातून दिल्या.
गजापूर गावात राहणाऱ्या मुस्लिम समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, दंगलीत नुकसान झालेल्यांना महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.