झेड.पी.निवडणुकीची रंगीत तालीम सुरु! केडगावच्या विका सोसायटी निवडणुक प्रचारात दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर ‘शक्ती प्रदर्शन’, आरोप-प्रत्यरोपाला सुरुवात..

दौंड : दौंड तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणूकांना सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी या सोसायट्यांची निवडणूक हा मोठा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. या सोसायटी निवडणुकांकडे झेड.पी. निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असून ज्यांचा पॅनल या सोसायटी निवडणुकीत बाजी मारेल त्यांना जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक सोपी जाईल असे भाकीत वर्तविले जात आहे.
केडगाव विका सोसायटी अशीच एक मोठी सोसायटी असून या सोसायटीसाठी जनसेवा पॅनल आणि सहकार परिवर्तन पॅनल हे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांना मानणारे दोन प्रबळ गट आमने सामने ठाकले आहेत! जनसेवा पॅनलने आमदार राहुल कुल यांचा फोटो आपल्या उमेदवारांच्या प्रचार पत्रिकेत छापला असून माजी आमदार रमेश थोरात यांना मानणाऱ्या सहकार परिवर्तन पॅनलने मात्र रमेश थोरात यांचा फोटो आत्तापर्यंत तरी आपल्या उमेदवारांच्या प्रचार पत्रिकेत छापलेला नाही हे विशेष. प्रचाराच्या शुभारंभाला सहकार परिवर्तन पॅनलचे प्रचार प्रमुख पाराजी हंडाळ यांनी याबाबत माहिती देताना आमचे नेत्यांवर प्रेम असून आम्ही नेत्यांचे फोटो प्रचार पत्रिकेत लावून नेत्यांवरील प्रेमाचा दिखावा करीत नसल्याचे सांगितले आहे. मात्र तसे असले तरी या पॅनलमध्ये काहीजण आमदार राहुल कुल यांनाही मानणारे असून त्यांना ही बाब खटकू शकते त्यामुळे आजपर्यंत तरी सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचार पत्रिकेवर माजी आमदार रमेश थोरात यांचा फोटो टाकण्यात आला नसल्याची चर्चा संपूर्ण केडगावमध्ये होत आहे.
दोन्ही बाजूने मोठे शक्ती प्रदर्शन केले जात असून प्रचाराच्या शुभारंभाला मोठ्या प्रमाणावर दुचाकिंची रॅली काढून एकदुसऱ्याला आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या केडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये एकूण 1700 सभासद (मतदार) असून यात 13 संचालक आहेत. यावेळी या 13 जागांसाठी एकूण 25 उमेदवार रिंगणात उतरले असून एक जागेसाठी फक्त एक उमेदवार असल्याने या जागेवर उमेदवार विजयी झाल्याचे मानण्यात येत आहे.
या जनसेवा पॅनलचा प्रचार शुभारंभ शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी केडगाव गावठाण येथील महादेव मंदिराच्या आवारात करण्यात आला तर सहकार परिवर्तन पॅनलचा प्रचार शुभारंभ रविवार दि.27 फेब्रुवारी रोजी त्याच ठिकाणी करण्यात आला.

या प्रचाराच्या निमित्ताने दोन्हीकडील प्रचार प्रमुख एक-दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करीत आपली बाजू मांडत आहेत. सोसायटीच्या निवडणुकीला केडगाव ग्रामपंचायतच्या कारभारावरही टीका केली जात आहे. तर आपलाच विजय निश्चित असून विरोधकांकडून पैसे आले तरी घ्या पण मतदान आम्हालाच करा असे आवाहनही या प्रचार सभांमध्ये केले जात आहे हे विशेष.