पुणे : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अजित पवारांकडून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं अभिनंदन
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कला क्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हसवलं.
मराठीसह हिंदी कलाक्षेत्र समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वावर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे असेही शेवटी अजित पवारांनी म्हटले आहे.