वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दौंड शहरात पुन्हा रास्ता रोको आंदोलन

दौंड

दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक रस्ता मार्गावरील शिवाजी चौक परिसरातील रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वास्तू वारंवार आंदोलने करूनही नगरपालिका प्रशासनाकडून काढल्या जात नसल्याच्या निषेधार्थ दौंड वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने आज दि. 3 जून रोजी पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी दौंड- सिद्धटेक रस्त्यावरील वाहतूक यावेळी रोखून धरत आमचे आंदोलन कोणत्याही जात, धर्म किंवा पक्षाविरोधात नसून शहरातील मुख्य रस्त्याला (शहर विकासाला) ठरत असलेल्या अडथळ्यांना आहे आणि तरीही हे वास्तूंचे अडथळे नगरपालिकेकडून काढले जात नाहीत म्हणून वारंवार पक्षाला आंदोलन करावे लागत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. रस्त्यांमध्ये असणाऱ्या वास्तूंशी संबंधित लोकांच्या व नगरपालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आम्हाला मुद्दाम आंदोलन करावयास भाग पाडले जात असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे.

आम्ही अनेक वेळा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना भेटून रस्त्यातील अडथळे, अतिक्रमण, वास्तू काढण्यात याव्यात म्हणून मागणी करीत आहोत, परंतु नगरपालिका वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने अनेक तारखा आम्हाला देऊन झाल्या आहेत. न.पा. कडून अतिक्रमण काढण्यासाठी फक्त आश्वासन मिळत आहे. कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे पक्षाच्यावतीने आंदोलनाचे पत्र नगरपालिकेला देण्यात आले होते. परंतु तरीसुद्धा न. पा.ने कोणतीही गांभीर्यता या विषयात दाखविली नाही किंवा आम्हाला बोलावून, विश्वासात घेऊन आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. याचा अर्थ तुम्हाला काय करायचे ते करा असा निघत असल्याने पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. आणि याला नगरपालिका कारणीभूत आहे असे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

सदर रस्त्यांमध्ये येणाऱ्या वास्तू काढण्यासाठी या वास्तूंशी संबंधित असणाऱ्या काही लोकांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे लाखो रुपयांची मागणी केली आहे आणि ती पूर्ण न झाल्यानेच या वास्तु काढल्या जात नाही आणि त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहून या ठिकाणी छोटे-मोठे अपघात व वाहतूक कोंडी होत आहे असा आरोपही अश्विन वाघमारे यांनी केला आहे.

मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी आंदोलकांची भेट घेतली व सदरची रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वास्तु पंधरा दिवसात काढण्यात येणार असल्याचे पत्र आंदोलकांना दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
अश्विनी वाघमारे, बंटी वाघमारे,शशिकांत जठार, रमेश तांबे, अजिंक्य गायकवाड, अक्षय शिखरे,राहुल नायडू ,सईबाई मन्यार ,बबलू जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.