दौंड शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, नागरिक त्रस्त..

दौंड : शहरात बेवारस कुत्र्यांच्या टोळक्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शहरातील कोणत्याही भागात किंवा गल्लीतून फेरफटका मारा, असंख्य बेवारस कुत्री तुमच्या स्वागतासाठी हजर असतात अशी परिस्थिती सध्या दौंडमध्ये पहायला मिळत आहे. अशा बेवारस कुत्र्यांच्या परस्परातील झुंजीमुळे अनेकांना अपघात होत आहेत. बेवारस कुत्र्यांच्या चावल्याने मृत्यू झाला असल्याची घटना दौंडकर नागरिकांनी अनुभवली आहे. अशी सर्व भयावह परिस्थिती असतानाही नगरपालिकेकडून मात्र कोणतीही उपाय योजना हाती घेतली जात नाही हे विशेष. या बेवारस कुत्र्यांचे काहीतरी केले पाहिजे किंवा करा यावर अनेकदा फक्त चर्चा झडताना दिसतात, प्रत्यक्षात कृती मात्र काहीच होताना दिसत नाही. सध्या अशाच बेवारस कुत्र्यांच्या टोळक्यामुळे शहरातील बंगला साईड (रेल्वे परिसर) परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. या परिसरातील नागरिकांना आपल्याच घरी जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. घरी जाताना कधी कोणता कुत्रा येऊन चावा घेतो की काय असे भितीदायक वातावरण सध्या बंगला साईड परिसरात झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या मधोमध कुत्र्यांची टोळी बसलेली असते, त्यामुळे त्यांच्यातून वाट काढण्याचे कोणी धाडस करत नाही. त्यांना रस्त्यातून हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास सारेच कुत्रे एक साथ अंगावर येतात असा अनुभव येथील नागरिक सांगत आहेत. आणि यांचा सर्वात जास्त त्रास महिला, लहान मुले व वृद्ध नागरिक यांना होत असल्याने, एखादी अनर्थ घटना घडण्या आधी या बेवारस कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.