अब्बास शेख
दौंड : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या पवार फुलवरे या कुटुंबांच्या सात जणांच्या सामूहिक हत्याकांडात वापरण्यात आलेली संशईत दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. एक मालवाहतूक पिकअप आणि एक दुचाकी अशी या गुन्ह्यात वापरलेली हि दोन वाहने आहेत. हि वाहने आरोपी राहत असलेल्या स्थानिक गावातील असल्याची माहिती मिळत आहे. या मिळालेल्या वाहनांनंतर या हत्याकांडात सहभाग असलेल्या आरोपिंची संख्या हि पाच पेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवार, फुलवरे कुटुंबातील एकूण सात जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव येथे असणाऱ्या भीमानदीच्या पात्रात टाकण्यात आले होते. हे हत्याकांड पवार यांच्याच चार चुलतभाऊ आणि एक चुलत बहिणीने केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पाण्यात टाकलेले हे सर्व मृतदेह एक-एक करून वर आल्यानंतर एकच खळबळ माजली होती.
अगोदर हि सामूहिक आत्महत्या असावी असा निष्कर्ष काढला जात असताना त्यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आणि लागलीच यातील संशईत आरोपिंना अटक करण्यात आली. मात्र हे सर्व आरोपी मृतदेहांना येथे कसे घेऊन आले याबाबत प्रश्न उपस्थित होत होता. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केलेल्या तपासामध्ये हत्याकांडात वापरण्यात आलेली हि वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या हत्याकांड प्रकरणात आरोपिंची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.