वाखारी येथे वकिलाकडून पैसे उकळणाऱ्या एजंट टोळीतील दोघांना गाडीसह अटक, अन्य आरोपिंच्या शोधासाठी पोलिस रवाना

केडगाव (दौंड ) : दौंड तालुक्यातील वाखारी येथे एका वकिलाची गाडी अडवून त्यांच्याकडून वाहन कर्जाच्या नावाखाली सुमारे २५ हजार रुपये उकळणाऱ्या खाजगी वाहन एजंट टोळीतील दोघांना यवत पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपिंचा शोध सुरु आहे. तुषार दत्तात्रय शेळके, (वय २४ वर्षे, रा. शेळकेवस्ती वाखारी ता.दौंड जि.पुणे) आणि रोहित गोविंद कड (वय ३३ वर्षे, रा. स्टेशन रोड, यवत ता.दौंड जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपिंची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार फिर्यादी यांच्यासोबत दोनवेळा घडला असून पहिला प्रकार दि.०९/०८/२०२५ रोजी दुपारी १२ः३० वाजता तर दुसरा प्रकार दि.१५/०८/२०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यातील फिर्यादी ॲड.मधुसूदन हिरा सदाफुले हे आपल्या कुटुंबियांसोबत पुणे दिशेकडे जात असताना आरोपिंनी फिर्यादी मधुसूदन हिरा सदाफुले यांची इनोव्हा गाडी वाखारीजवळ अडवून त्यांना पैशांची मागणी केली.

यावेळी आरोपिंनी त्यांना २५ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. आरोपी हे पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची ब्रिझा गाडी क्र. MH.12.NP.0728 आणि राखाडी रंगाची अन्य चारचाकी गाडी क्र. MH.12.KY.6352 या वाहनांमधून आले होते. आरोपिंनी फिर्यादी यांना त्यांच्या टोयोटा कंपनीच्या इनोवा वाहनावर कर्ज असल्याचे सांगून फिर्यादी यांच्यासोबत पत्नी व मुलगी असताना त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे अश्लील भाषेत शिवीगाळ व हावभाव करून २५ हजार रोख रक्कम जबरदस्तीने देण्यास भाग पाडली होती.

त्यानंतर आरोपिंमधील एकाने फिर्यादी यांना फोन करुन तुमचे वाहन अडविण्याचा प्रकार माझ्याच माणसांनी केलेला आहे, तुम्ही प्रकरण वाढवू नका, पोलीसात तक्रार करू नका अशी धमकीहि दिली होती. या सर्व प्रकरानंतर फिर्यादी यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यवत पोलिसांनी शिताफिने तपास करत पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची गाडी क्र. MH.12.NP0728 आणि राखाडी रंगाची चारचाकी गाडी क्र. MH.12.KY.6352 या वाहनांच्या मालकांबाबत माहिती घेतली.

पोलिसांनी फिर्यादी यांना धमकी देणा-याच्या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती प्राप्त करुन या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत आरोपी तुषार दत्तात्रय शेळके, (वय २४ वर्षे, रा. शेळकेवस्ती वाखारी ता.दौंड जि.पुणे) आणि रोहित गोविंद कड (वय ३३ वर्षे, रा. स्टेशन रोड, यवत ता.दौंड जि.पुणे) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसमवेत गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची ब्रिजा गाडी क्र. MH.12.NP.0728 हि हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील इतर आरोपी आणि एक वाहन यांचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि महेश माने हे करित आहेत.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, दौंड चे उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि महेश माने, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक सागर माने, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद भोसले, सफो शिंदे, पो.हवा. गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, संदीप देवकर, दत्ता काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, बाळासो चोरमले, गणेश सोनवणे, प्रमोद गायकवाड, सचिन साळुंखे, वैभव भापकर, पो.कॉ. मारूती बाराते, विनोद काळे, अमोल भुजबळ, विशाल गवारी, सचिन काळे, शुभम मुळे, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली आहे़.