दौंड : दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातून नाराजी व्यक्त केली जात आहे. निवडणुकांमध्ये विश्वासात घेतले नाही तर आगामी निवडणुकांमध्ये योग्य निर्णय घेऊ असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी दिला आहे.
दौंड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु असून माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 3 जागेंवर निवडणूक पार पडणार आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरून शिवसेना नेते महेश पासलकर यांनी नाराजी व्यक्त केली असून आमचा एकही उमेदवार या संघात घेतला नाही, आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप त्यांनी केला असून जर हे असेच सुरु राहिले तर आगामी निवडणुकीत योग्य निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.
सर्वांना विश्वासात घेऊनच प्रक्रिया पार पडतील काम होईल, कुणावर अन्याय होणार नाही : आप्पासाहेब पवार
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी बोलताना निवडणूक प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेऊनच सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत. मला याबाबत कुणीही संपर्क केला नाही अन्यथा उमेदवार आणि त्यांचे प्राबल्य पाहून निश्चित उमेदवारी बाबत विचार झाला असता. कुणीही गैरसमज करून घेऊ नये. आगामी काळातही सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, कुणावरही अन्याय होणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले आहे.