सुधीर गोखले
सांगली : मिरजेतील आदर्श शिक्षण मंडळाच्या आदर्श शाळेमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला, तो म्हणजे शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वाहतुकीच्या नियमा संदर्भातील ‘सहविचार सभा’.
अलीकडील दिवसांमध्ये रस्त्यावरून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात काही वाहन स्वार आपली वाहने सुसाट घेऊन जात असतात तर काही वाहनचालकांना वाहतुकींच्या नियमांची पर्वाच नसते. अनेकांना वाहतुकीचे नियमही असतात याबद्दल अज्ञान असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मिरजेतील आदर्श शिक्षण मंदिर शाळेमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल शाळा संचालकांनी एक कार्यशाळा घेतली आणि त्यामध्ये थेट उपप्रादेशिक वाहन अधिकारी आणि शहरातील पोलीस वाहतूक निरीक्षक अशा जबाबदार व्यक्तींना काही तासासाठी शिक्षक बनवलं.
वाहतुकीचे नियम विशेषतः जे रिक्षा चालक शाळेतून विद्यार्थ्यांची वाहतूक आपल्या रिक्षेतून अथवा खाजगी गाड्यातून करतात अशा सर्व वाहतूकदारांना आणि पालकांना एकत्रित पणे नियमांचे धडे देण्याचे काम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नाली जाधव आणि मिरज शहरातील वाहतुकीची समस्यांचा रोज सामना करणारे आणि नियमांना अनुसरून या वाहतुकीला चांगली शिस्त लावण्याचा नेहमी प्रयत्न करणारे मिरज शहर वाहतूक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले.
या विशेष आशा कार्यशाळेत वाहतूक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले, ‘रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षेतून विद्यार्थ्यांची वाहतूक करत असताना आपल्या रिक्षेच्या क्षमतेचा विचार करावा आणि आपल्या वाहतुकीच्या नियमांचे पालन जबाबदारीने करावे. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक हा गुन्हा आहे’. तर परिवहन अधिकारी स्वप्नांची जाधव यांनी विद्यार्थी वाहतुकीच्या परवान्याबाबत मार्गदर्शन केले आणि रिक्षामध्ये अधिक विद्यार्थी भरणे आणि होणाऱ्या दंडाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी मुख्याध्यपिका स्नेहलता कुरणे, जयश्री पाटील, प्राची जोशी आर बी जत्ते उपस्थित होते.