दौंड : मराठा आंदोलकांवर हल्ला झाल्यानंतर आता याची धग सर्वत्र जाणवू लागली आहे. काल दौंड तालुक्यातील पारगाव, खडकी, कानगाव सह विविध गावे बंद होती तर आज यवत, भांडगाव, खुटबाव, हातवळण बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे. तर उद्या केडगाव, बोरीपार्धी आणि परिसरातील गावे बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे.
जालना जिल्हातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बेछुट लाठीमार करण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध जिल्ह्यामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप मराठा समाजातील युवकांकडून करण्यात येत आहे.
लाठी, बंदूक, बळाचा वापर करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रशासनाकडून निर्माण करण्यात आला, संपूर्ण गावावर बळाचा वापर करून जखमी करण्यात आले व त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मागणी रास्त होती त्यामुळे दडपशाही ने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक आहे. मोर्चा आंदोलन, उपोषण ही शासनाचे लक्ष वेधण्याचा शांतीचा मार्ग आहे, पण राज्यकर्ते याला चुकीच्या पद्धतीने हाताळतात,
या सर्व घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महात्मा तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश फडके यांनी हातवळण येथील सभेत केली.