हा निकाल सर्वोच्च न्यायालय आणि जनतेच्या दरबारात टिकणार नाही-उद्धव ठाकरे | निकालात उद्धव ठाकरे यांना धक्का, मात्र शिंदे-ठाकरे गटाचे आमदार पात्र

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तनाट्य आणि अपात्र आमदार प्रकरणावर आज अखेर निकाल देण्यात आला आहे. या निकालात शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धक्का देत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल देण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा निकाल दिला असून दोन्ही बाजूचे आमदार पात्र राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही दावा केला होता. या नंतर निवडणूक आयोगाने शिंदे यांचा दावा योग्य ठरवला होता. हे होत असताना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने शिंदे गटाच्या 16 आमदारांविरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल करण्यात आली होती तर त्यावेळी शिंदे गटाच्या वतीनेही ठाकरे गटातील 14 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सध्या देण्यात आलेल्या निकालामध्ये दोन्ही गटातील आमदार अपात्रतेच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळून लावल्या.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर निर्णय देताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना गटाला मोठा धक्का देत बहुमताच्या आधारावर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हटले आहे. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने 21 जून 2022 च्या  शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरविता येणार नाही असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं आहे.

हा निकाल सर्वोच्च न्यायालय आणि जनतेच्या दरबारात टिकणार नाही – उद्धव ठाकरे
विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हा निकाल सर्वोच्च न्यायालयात आणि जनतेच्या दरबारात टिकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच देण्यात आलेल्या निकालावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.