सराईत गुन्हेगाराकडून मोठी घरफोडी उघड | सोने, चांदीचा 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : लोणावळा येथे वास्तव्यास असणारी एक वृद्ध महिला आपल्या पुण्यातील मुलीला भेटायला गेल्यानंतर तिच्या घरातील सुमारे ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २ किलो वजनाची चांदीची भांडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी योग्यदिशेने तपास करून यातील अंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी विना नारायण मुळे (वय ६५ वर्षे रा. राजुजी कॉलनी, लोणावळा, पुणे) या दि.२५/०५/२०२५ रोजी त्यांची मुलगी अबोली हिच्याकडे गेल्या होत्या. दि. ०९/०६/२०२५ रोजी सकाळी विना मुळे यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या शेजारी मॉरीस यांनी त्यांना फोन करून सांगितले. त्यानंतर विना मुळे या त्यांची मुलगी अबोली हिच्यासह लोणावळा येथील घरी आल्या.  यावेळी त्यांच्या घराचे कुलुप तोडून एकूण ४७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २ किलो ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा एकूण २९ लाख २६,००० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेला होता. याबाबतची फिर्याद त्यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर चोरीच्या अनुषंगाने तपास सुरु करण्यात आला. 

तपासादरम्यान उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेजवरून सराईत गुन्हेगार चंदू माने (रा. चाफेकर नगर झोपडपट्टी चिचवडगाव पुणे) व त्याचा साथीदार धनंजय हरीष काळे (वय २० वर्षे, रा.भारतनगर, झोपडपट्टी, चिचवडगाव पुणे) यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी लोणावळा येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींना लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येउन मा. न्यायालयासमक्ष उपस्थित करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेवून तपास करता, आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने व चांदीची भांडी ही आरोपी  दिपक शिवाजी मेंदगे (कर्जत, जि. रायगड) कैलासचंद्र धगनलाल जाट  (स्वस्तीक व्हिला, वाशी) यांच्या मदतीने विक्री केले असल्याचे संमजले.

त्याप्रमाणे त्या दोघांना ताब्यात घेवून तपासादरम्यान ३४ तोळे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २ किलो ग्रॅम वजनाची चांदीची वीट असा एकूण ३० लाख ०१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, यातील आरोपी चंद्रकात माने याच्यावर सुमारे ५० हून अधिक घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत ठेवत असतो.

सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक  रमेश चोपडे (पुणे विभाग) मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, प्रभारी लोणावळा विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. राजेश रामाघरे, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत. लोणावळा. शहर पो स्टेचे सपोनि राहूल लाड, ग्रेड पोसई रमेश भिसे, ग्रेड पोसई सूर्यकांत वाणी, स्थागुशा चे पोलीस अमलदार, राहुल पवार, सागर नामदास, थिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडग, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, ग्रेड पोस मुकुंद कदम, लोणावळा शहर पोस्टे पोलीस अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.