यवत, दौंड : दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे चोरट्यांनी कोयता आणि लोखंडी टॉमी ने केलेल्या हल्ल्यात पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक १९ /०८|२०२५ रोजी रात्री २:१५ च्या सुमारास घडली असून या हल्ल्यानंतर चोरट्यांनी घरातील सोने आणि रोकड असा २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर शांताराम गायकवाड (वय-३४ वर्षे व्यवसाय शेती (रा. बोरीऐंदी ता.दौंड जि.पुणे) हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना दि.१९ ऑगस्ट रोजी रात्री २:१५ च्या सुमारास त्यांच्या घरामध्ये तीन अनोळखी इसमांनी घराच्या खिडकीतुन हात घालून दरवाजाची कडी उघडुन घरात प्रवेश केला. यावेळी सागर गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी लोखंडी टॉमी व लोखंडी कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत केली.
यानंतर चोरट्यांनी शांताराम गायकवाड यांना शिवीगाळ, दमदाटी करुन सोन्याचे दागीने व १ लाख १५ हजारांची रोख रक्कम असा एकुण २ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेत शांताराम गायकवाड आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उरुळीकांचन येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.