अख्तर काझी
दौंड : दौंड शहरात शौचालय ( मुतारी) नाही अशी परिस्थिती झाली आहे. शहरातील शौचालयांचा प्रश्न नगरपालिकेने मार्गी लावावा अशी वारंवार मागणी करूनही काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ दौंड शहर व तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्यावतीने शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना लघवी भांड्यांचे (युरीन पॉट) वाटप करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
शहरामध्ये पुरुष- महिलांसाठी शौचालय नाही यासाठी अनेकदा विविध पक्षाने आंदोलने केली. काही स्वयंसेवी संस्थांनी शौचालय बांधून देण्याची तयारी दर्शविली तरी सुद्धा नगरपालिकेला शहरातील शौचालयाचा प्रश्न सोडविता आलेला नाही, त्यामुळे अखेर मनसेने हा वेगळ्या धाटणीचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमानंतर नगरपालिकेला थोडी जरी लज्जा वाटली तर ते शौचालयाचा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे असे मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे यांनी सांगितले.
दौंड शहरात स्वच्छतागृह नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची, वयोवृद्धांची तसेच विशेषता महिलांची मोठी कुचंबना व गैरसोय होत आहे. बाजारपेठेतील व्यापारी, बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले बाहेर गावचे ग्राहक यांनाही शहरात मुख्य बाजारपेठेत मुतारी नसल्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थिती विरोधात मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. आणि म्हणूनच नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करताना आज मनसेच्या वतीने दौंडकर नागरिकांना, व्यापाऱ्यांना व बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना लघवी भांडे वाटप करण्यात आले.
मनसेचे तालुका अध्यक्ष सचिन कुलथे, शहराध्यक्ष संदीप बोराडे, मंगेश साठे, नंदकिशोर मंत्री, अभिजीत गुधाटे, अझर कुरेशी, सचिन शिंदे यांनी आयोजन केले. मा. नगरसेवक बबलू कांबळे, शहानवाज पठाण, राजेश जाधव, नागसेन धेंडे, शैलेश पवार ,अमोल जगताप, गणेश दळवी ,रामेश्वर मंत्री आदींनी या उपक्रमास भेट देऊन आंदोलनास पाठिंबा असल्याचे दर्शविले.