केडगावमध्ये विजेचा लपंडाव, नागरिक उकाड्याने हैराण मात्र महावितरण ला घाम फुटेना

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून केडगावची ओळख. येथील नागरिकांचा चांगुलपणा ही केडगावची जमेची बाजू मात्र याच केडगावच्या नागरिकांच्या चांगुलपणाचा महावितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर गैर फायदा घेतला जातोय असा आरोप आता येथील सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.

विषय ही तसाच म्हणावा लागेल, कारण येथील नागरिकांच्या मते आम्ही वीजबिल भरतो, त्यातील हे चार्ज ते चार्ज असे सुमारे चारशे पाचशे रुपये तर आमच्याकडून घेतले जातात मात्र सर्व्हिस आणि वीज मात्र पुरेपूर अशी दिलीच जात नाही. कायम काही ना काही कारण सांगून दिवस दिवसभर लाईट घालवली जाते, ऐन उन्हाळ्यात पारा ४२ च्या पुढे असताना दिवसभर लाईट घालवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो.

तर रात्रीच्यावेळी अचानक लाईट घालवून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागते. केडगावकरांना ऐन यात्रेच्यावेळी तर मोठा धक्काच देण्यात आला. यात्रेच्या एक दिवस अगोदर केडगावमध्ये लाईट घालवून रात्रीपर्यंत काम सुरु ठेवण्यात आले. यात्रेच्या दिवशी दिवसभर लाईट येजा येजा करत असल्याने स्थानिकांसह आलेले पाहुणे सुद्धा बेजार झाले.

यात्रेच्यावेळी लाईट च्या लपंडावाला त्रासलेले नागरिक आज शनिवारीही मेंटेनन्स च्या नावाखाली घालविण्यात आलेल्या लाईटमुळे पुरते बेजार झाल्याचे पहायला मिळाले आहेत. आज शनिवारी सकाळी १०:३० वाजता गेलेली लाईट सायंकाळी ७:०० वाजताही आलेली नव्हती. विजेच्या (लाईटच्या) लपंडावाने येथील नागरिक पुरते वैतागलेले दिसत आहेत. महावितरण कंपनीला मात्र याचे काही देणेघेणे दिसत नाही अन्यथा त्यांनी दररोज विविध कारणे देऊन असा नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ मांडला नसता अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.