मग नेमकं खोटं कोण..! बादशहा शेख की रमेश थोरात, बादशहा शेख यांच्या घरवापसीवर नागरिकांचा सवाल

दौंड : खासदार सुप्रिया सुळे व मा. आमदार रमेश थोरात यांनी माझा अपमान केला, त्यामुळे अपमानित होऊन मी राजकारण करणार नाही, आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे काम करणार नाही असे बादशहा शेख यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले होते. शहराच्या विकासासाठी व जो कोणी सन्मानाने बोलावून एकत्र काम करण्यासाठी विचारणा करेल त्याच्याबरोबर जाणार अशी भूमिका बादशहा शेख यांनी घेतली होती. त्यामुळे ते नक्की कोणाबरोबर जमवून घेतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीतच घर वापसी केल्याने त्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. बादशहा शेख यांनी त्याच राष्ट्रवादीशी का जुळवून घेतले याचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यात अणि माजी आ.रमेश थोरात यांच्यात दिलजमाई झाली असून आमच्या मधील मतभेद मिटले आहेत. मी पुन्हा राष्ट्रवादीतच काम करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मात्र, रमेश थोरात यांच्यासारखा खोटा माणूस मी माझ्या 25-30 वर्षाच्या राजकीय प्रवासात पाहिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दौंड शहरासाठी आज पर्यंत काहीच केले नाही. आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया, योगेश कटारिया यांनी शहरातील शेकडो युवकांना नोकऱ्या लावल्या परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या नेहमी पाठीशी राहणाऱ्या या शहरातील एकालाही खा.सुप्रिया सुळे किंवा रमेश थोरात यांनी नोकरी लावली नाही असे खुद्द बादशहा शेख यांनीच पत्रकार परिषदेमध्ये सांगत रमेश थोरात यांच्यावर बेछूट आरोप केले होते आणि आठ दिवसांतच त्यांनी पुन्हा त्याच राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली असल्याने नेमकं खोटं कोण.! रमेश आप्पा की बादशाह भाई असा प्रश्न दौंड मधील नागरिक विचारत आहेत. बादशहा शेख यांच्यासारख्या मुरब्बी राजकीय व्यक्तीने रमेश थोरात यांच्यासारख्या नेत्यावर जे आरोप केले होते त्यामुळे खुद्द रमेश थोरात यांचे अनेक कार्यकर्तेही नाराज झाले होते. या सर्व राजकीय नाट्यावर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा राजकीय स्टंट स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी केला गेला असल्याचे म्हटले आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकीत बादशहा शेख दौंडकर नागरिकांकडे कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीसाठी मते मागणार हा प्रश्न उपस्थित होणार आहे. एकतर बादशहा शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी व रमेश थोरात यांच्यावर तोंडसुख घ्यायला नको होते, आणि तसे घेतलेच होते तर त्याचा पुरावा द्यायला हवा होता, पण यात उलटेच होऊन ज्यावर आरोप केले त्याच पक्षात घरवापसी तीही आठ दिवसांत कशी काय केली असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या सर्व प्रकरणात मात्र राष्ट्रवादी पक्ष नाही तर बादशहा शेख यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे आणि तो त्यांच्या अताताईपणामुळे झाले आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.